वर्ष सरकत राहतात, काळाचा पट मागे पडतो, जुनं मागे पडतं. विज्ञानाची प्रगती होते पण निसर्ग आपली ताकद दाखवतच असतो. मनुष्यप्राणी प्रगती करतो तशीच त्याची अधोगतीही होते. तो क्षेपणास्त्र तयार करतो, ती वापरली जावीत म्हणून युद्ध घडवून आणतो. आणि मग ‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणून त्यावर भरपूर कथाही लिहितो. माणसाचा वृथा अभिमानच त्याला लढण्यास, कपट कारस्थान, , हेवेदावे करण्यास प्रवृत्त करतो. तरीही कालचक्र सुरुच राहतं. संपादकासाठी दिवाळी अंकाची निर्मिती हा सुद्धा त्या कालचक्राचाच एक भाग म्हणून याही वर्षी धनंजयचा दिवाळी अंक वैविध्यपूर्ण आणि विपुल साहित्यासोबत घेऊन आला आहे. रहस्य, भय, गूढ, विज्ञान इत्यादी कथांच्या निर्मितीची बीजे आपल्याला सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या आयुष्यातच सापडतात का ? एखादी गोष्ट करू नको म्हटलं की करायचीच हा मनुष्य स्वभाव. त्यासाठी नियम मोडायलाही मन कचरत नाही. नोकरी सोडायची इच्छा असली तरी कामाचा रेटा त्याला अडकवून ठेवतो म्हणजे माणूस गुलाम होतोय का ? कोणाचा गुलाम ? एखाद्या जगप्रसिद्ध चित्रकाराचं पेंटिंग अस्सल आहे हे कसं ओळखायचं ? श्रीमंत होण्याचे तांत्रिक मार्ग खरंच श्रीमंत बनवतात का ? विज्ञानाने केलेल्या संशोधनाचा फायदा फक्त उच्चश्रूंनाच आणि गिनीपिग होणार गरीब. बायको माहेरी गेली म्हणून चार दिवस निवांत काढायचे तर कोणी तरी सापळा रचतो. जिवंतपणी झालेल्या अन्यायाचा बदला आत्मे घेतात तसेच आत्मे कुणाला कुंपणातही अडकवून ठेवतात. विकृत वासना असलेले आत्मे दुहेरी जीवन जगत अनेकांचे बळी घेत राहतात तर सिद्धी प्राप्त होण्यासाठी कुणी बालकांचे बळी घेतात. हे कसं थांबवणार ? अगदी जवळचा मित्रही फसवतो तेव्हा मन सूडाने पेटून उठतं. नागरिकांना सुरक्षित ठेवायचं. म्हणून लावले जाणारे स्कॅनर्सही गमती करतात का ? आणि सुरक्षिततेच्या नावाखाली स्कॅनर्समुळे नागरिकांनी आपलं स्वातंत्र्य गमावणं कितपत योग्य आहे ? आपण जे बोलतो, शोधतो त्याच्याशी संबंधित माहिती लगेच आपल्याला, आपण वापरत असलेल्या डिव्हाईसवर मिळते. आपण स्वतंत्र होत आहोत की या विश्वाच्या जाळ्यात अलगद सापडत आहोत ? खरंच का एक अनाकलनीय असा तिसरा डोळा सर्वांवर लक्ष ठेवून आहे आणि तो अलगद आपल्या सर्वांना ताब्यात घेणार आहे ? अशा अनेक प्रश्नांचा परामर्श घेणाऱ्या धनंजय मधील कथाविश्वाचा हा संक्षिप्त आढावा.
Dhananjay Diwali Ank 2024 ( धनंजय दिवाळी अंक २०२४ )
₹400.00
8 in stock
Reviews
There are no reviews yet.